नावातील गोंधळामुळे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाला दिला ‘डिस्चार्ज’

पोलिसनामा ऑनलाईन – नावातील साधर्म्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आसाममधील डारंग जिल्ह्यातील मंगलदोई रुग्णालयातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून आलेल्या कोरोनामुक्त 14 जणांची यादी रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी रुग्णांसमोर वाचून दाखवली. या यादीतील दोन नावांमध्ये साधर्म्य असल्याने हा गोंधळ झाला.

कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांच्या यादीत हमिद अली यांचे नाव होते. पाच जूनपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी जेव्हा यादी वाचली तेव्हा दुसर्‍या हनीफ अली यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. हनीफ यांना तीन जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट अद्याप निगेटिव्ह आला नव्हता. हमिद आणि हनिफ या नावांच्या उच्चारात साधर्म्य आढळल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी कर्मचार्‍यांनी चुकीचा निर्णय घेतल्याने हनिफ यांना डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हनीफ रात्री नऊ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी पोहोचले. त्यादरम्यान रुग्णालयातील प्रशासनाला या गंभीर चुकीची जाणीव झाली आणि हनीफ यांना पुन्हा रुग्णालयात आणण्याचे ताबडतोब प्रयत्न सुरू झाले. हनीफ यांना गुरुवारी रुग्णालयात परत आणल्याची माहिती डारंग जिल्ह्याचे उपायुक्त दिलीप बोरा यांनी दिली. सुदैवाने 11 जून रोजी हनीफ यांची पुन्हा चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.