आसाम पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी भाजप नेत्यानं काढला पळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आसाम पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी नाव समोर आल्यानंतर राज्यातील वरिष्ठ भाजपा नेते दिबान डेका यांना जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. हेच कारण देत त्यांनी राज्य सोडले आहे. त्यांनी कोणत्याही क्षणी माझी हत्या केली जाण्याची भिती वाटत होती असे म्हटले आहे. माझ्याविरुद्धात कट रचण्यात आला असून यामध्ये आसाम पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ भ्रष्ट अधिकार्‍यांचाही समावेश आहे असा आरोपही डेका यांनी केला आहे.

भाजपच्या शेतकरी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा सदस्य असल्याचे सांगणार्‍या डेका यांची आसाम पोलीस भरती प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी चौकशीही झाली आहे. आसाम पोलिसांच्या सीआयडीने आणि गुवहाटी पोलिसांनी डेका यांची चौकशी केली आहे. याच प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काल दुपारी माजी डीआयजी पी. के. दत्ता यांच्या घरावरही छापा मारला. दत्ता यांच्या मालकीच्या काही हॉटेल्स आणि राज्याच्या राजधानीत त्यांच्या मालकीच्या काही संपत्त्यांवरही पोलिसांनी छापे मारले. आसाममधील पोलीस खात्यातील उप निरीक्षक पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. यामध्ये राज्य सरकारमधील एक महिला कर्मचार्‍याचाही समावेश आहे. याच प्रकरणात इतर पाच जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये विशेष कार्य गटाच्या (एसटीएफच्या) एका कर्मचार्‍याचाही समावेश आहे. ज्या कंपनीला ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्या कंपनीशी माझा संबंध आहे असं डेका यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे .