राहुल गांधीचा RSS वर हल्लाबोल, म्हणाले – ‘नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेयं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि आरएसएसला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी सध्या आसाम दौ-यावर असून ते विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. दिब्रुगढमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला.

खासदार राहुल गांधी म्हणाले, आज देशात लोकशाहीचं पतन होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. राहुल गांधी यांनी यावेळी आसामच्या जनतेला पाच आश्वासने दिली आहेत. भाजपाने आसामच्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना 351 रुपये रोज देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात 167 रुपयेच दिले जातात. पण मी नरेंद्र मोदी नाही, मी फसवणार नाही. आज मी तुम्हाला 5 गोष्टींची खात्री देतो. चहाच्या मळ्यातल्या मजुरांसाठी 365 रुपयांचा दर, सीएएला विरोध, राज्यात 5 लाख रोजगाराच्या संधी, 200 युनिटपर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक गृहिणीसाठी 2 हजार असे गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान 27 मार्च रोजी आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.