इराणी अणुबॉम्बच्या जन्मदात्याची दिवसाढवळ्या हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   तेहरानमध्ये (Tehran) इराणचे ( Iran) अणुबॉम्बचे जनक वैज्ञानिक मोहसिन फखरीजादेह ( mohsen fakhrizadeh) यांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. यामुळे इराणचा इस्त्रायलसोबतचा तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे पुरावे सापडल्याने इराणकडून हा आरोप करण्यात येत आहे. इस्त्रायलने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ ( Mohammd Javad Jarif) म्हणाले की, दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी वैज्ञानिकाची हत्या केली.

या हत्येवरून असे दिसून येते की, इस्त्रायल युद्धासाठी उतावीळ आहे. इस्त्रायलच्या बेजामिन नेतन्याहू यांनी एका कार्यक्रमात फखरीजादेह यांचे नाव घेतले होते. फखरीजादेह हे प्रवास करत असताना तेहरानजवळ हल्लेखोरांकडून त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. फखरीजादेह हे 2003 पासून इराणच्या गुप्त अणुबॉम्ब निर्मिती मोहिमेचे नेतृत्व करत होते. मात्र, इराणकडून आण्विक हत्यारे बनविण्याच्या आरोपांचे नेहमी खंडण करण्यात येत होते. इराणचे मिलिट्री कमांडर हिसैन देहघन यांनी ट्विट करून या हत्येचा मोठा बदला घेतला जाईल. या हल्ल्यात ज्यांचा कोणाचा हात आहे ते लोक पश्चावणार आहेत, अशी धमकीसुद्धा देण्यात आली आहे. वैज्ञानिकावरील हत्येची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. इस्त्रायलकडूनसुद्धा यावर बोलण्यास नकार देण्यात आला आहे. फखरीजादेह यांना द फादर ऑफ इरानियन बॉम्ब असे म्हटले जाते.

अमेरिकेचे आरोप

अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत इराणजवळ अण्वस्त्र तयार करण्यासाठी मुबलक सामग्री पोहोचू शकते. मात्र, इराण अण्वस्त्र तयार करण्याचे आरोप नाकारत आहे. इराण आणि उत्तर कोरिया मिळून लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. उत्तर कोरियाकडून इराणला अण्वस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे साहित्य पुरवण्यात येणार आहे. अण्वस्त्र तयार करण्याच्या कामाला या देशांकडून नेमकी केव्हापासून सुरुवात करण्यात आली, यासंदर्भात अमेरिकेने कोणतीही माहिती दिली नाही.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की 2015ला करार झाला असतानासुद्धा इराणकडून अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. इराणने अणू कार्यक्रम थांबवल्यास त्याला जागतिक बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल, असे करारामध्ये ठरवण्यात आले होते. पण, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडुन हा करार रद्द करण्यात आला व इराणवर निर्बंध लादण्यात आले. याच वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेकडून एअर स्ट्राइकद्वारे इराणचा मिलिट्री जनरल कासिम सुलेमानीची हत्या करण्यात आली होती.