दारू पिण्यास नकार दिल्याने लष्करी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; मेजरसह चौघांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दारू पिण्यास नकार दिल्याने राग येऊन चौघा लष्कर अधिकाऱ्यांनी त्याच्या तोंडात जबरदस्तीने दारू ओतली व लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार औंध मिलेटरी स्टेशनमधील एफटीएन बॅरकेमध्ये ३ जून रोजी सायंकाळी सात वाजता घडला होता.

याप्रकरणी रमेश मोहनराव विष्णोई (वय २६, रा. नांदिया प्रीावती, ता. भोपालगड, जोधपूर, सध्या औंध मिलेटरी स्टेशन) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मेजर सोहम सिंग बिस्ट, लेफ्टनंट महिपालसिंह खाती, सुभेदार सुभाषचंद्र, नाईक सुभेदार विकास मंडळ नाई अधिकारी (सर्व रा. औंध मिलेटरी स्टेशन) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मेजर व इतर एफटीएन बॅरेक रुम नंबर १२ मध्ये दारू पित बसले होते. त्यांनी रमेश विष्णोई यांना बोलावून त्यांच्याबरोबर दारू पिण्याचा आग्रह केला. त्याला विष्णोई यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना राग आला. मेजर बिस्ट व लेफ्टनंट खाती यांनी त्याला पकडून दारु पाजण्यास सांगितले. नाईक विकास मंडल याने जबरदस्तीने दारू त्यांच्या तोंडात ओतली. मेजर बिस्ट यांनी लाकडी दांडके डोक्यात मारुन त्यांना खाली पडले. त्यानंतर इतरांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांचे हातपाय बांधून तोंडात कापडाचा बोळा कोबला. लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात विष्णोई हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर विष्णोई यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला आहे.