अमरनाथ यात्रेनंतर होणार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक ; निवडणूक आयोगाची घोषणा

श्रीनगर : वृत्तसंस्था : जम्मू काश्मीर मध्ये विधानसभेची निवडणूक अमरनाथ यात्रेनंतर होणार आहेत, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा १ जुलैपासून सुरु होईल. अमरनाथ यात्रा ४६ दिवस चालेल. यात्रेचा शेवट १५ ऑगस्टला होईल. निवडणूक आयोगाने प्रेस नोट जाहीर करून सांगितले की, सर्व पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की, अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या जातील.

वर्षाच्या शेवटपर्यंत होणार निवडणूक
निवडणूक आयोगाचे कनिष्ठ सचिव पवन दिवानने एका प्रेस नोटमध्ये म्हंटले की, निवडणूक आयोगाने संविधानाचे कलम ३२४ आणि इतर कायद्यांचा विचार करून हा निर्णय घेतला की या वर्षीच्या शेवटपर्यंत विधानसभा निवडणूक घेतली जाईल. तोपर्यंत निवडणूक आयोग जम्मू काश्मीरच्या परिस्थितीचे परीक्षण करत राहील. यासाठी सर्व पक्षांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल. ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात जम्मू काश्मीरच्या निवडणूक होतील असा अंदाज बांधला जात आहे.

२०१४ ला काय होता जनादेश ?
जम्मू-कश्मीरच्या विधानसभेत ८७ जागा आहेत. या ८७ जागा तीन क्षेत्रात विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये कश्मीरच्या ४६, जम्मूच्या ३७ आणि लडाखच्या ४ जागांचा समावेश आहे. जर निवडणुकीत महिलांचा योग्य सहभाग नसेल तर राज्यपाल २ महिलांची नेमणूक विधानसभेवर करू शकतो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. २०१४ मध्ये पीडीपीला २८ भाजपला २५ तर नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस येथे १२ जागा मिळवण्यास यशस्वी ठरली होती.