Vijay Wadettiwar : ‘बंगालमधील पराभवामुळे चंद्रकांत पाटील डिस्टर्ब, टीका सहन करण्याची ताकद हवी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील पाच राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल रविवारी (दि.2) जाहिर झाला. निकाल हाती आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. बंगालमधील निकाल जाहिर झाल्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजय वडेट्टिवार म्हणाले, बंगालमधील निवडणुकीत पराभवानंतर चंद्रकांत पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल, तर टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीचे योग्य नियोजन केले असते, तर कोरोना वाढला नसता असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. सामुहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता केवळ घोषणा केली. कोरोनावरुन सवोच्च न्यायालयाने केंद्राला चांगलीच चपराक दिली आहे. केंद्र सरकारचे लसीकरण बिघडले आहे. अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी निवडणुका घेतल्या. त्यामुळे देशात बिकट स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे आकडे लपवले जात नाहीत. इतर राज्यांमध्ये आकडे लपवले जातात, असा दावा वडेट्टीवार यांनी केला . सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन केंद्र कसे करते हे पहावे लागणार आहे. रुग्णसंख्या लाखोंच्या घरात जात असताना लॉकडाऊन घोषित का केला जात नाही, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

दरम्यान, जामिनावर सुटला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.