फक्त 2 दिवसात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग गुरुवारी (दि. १९) जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना सर्वात आधी जाहीर होईल. दरम्यान, मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार असून ते स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन निवडणूकांच्या तारखांची घोषणा करतील अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर त्याचा अहवाल दिल्लीमध्ये सादर करण्यात येईल. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली जाईल. महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आधी निवडणुका होतील. अद्याप या दोन्ही राज्यातील निवडणुकीसंदर्भात अधिसुचना प्रसिद्ध केलेली नाही.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकांच्या तारखा 20 सप्टेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या आणि मतदान 15 ऑक्टोबरला झाले होते. झारखंड विधानसभा 2014 च्या निवडणुकांसाठी पाच टप्प्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये मतदान पार पडले होते. यावर्षी देखील ऑक्टोबरमध्ये या तिन्ही राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.