…मग तेंव्हा कोणते राजकारण होते : उद्धव ठाकरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘ईडी’च्या कारवाई वरुन सुडाचे राजकारण केले जात असल्याचे सांगितले जातय मग, मुंबईच्या दंगलीप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांना नाहक अटक केली होती तेव्हा काय धर्माचे, न्यायाचे राजकारण होते का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तर बंडखोरांना थारा नसल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ  (शुक्रवारी) पिंपरीतील आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, डॉ. रघुनाथ कुचिक, महायुतीचे चिंचवडचे उमेदवार लक्ष्मण जगताप, महापौर राहूल जाधव, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, अर्जुन डांगळे, सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सदाशिव खाडे, अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, राजेश पिल्ले, बाबू नायर, जितेंद्र ननावरे, यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, विरोधकांचे टार्गेट आम्ही असू तर आम्ही पळपूटे नाहीत. उलटा वार करणारच. आम्ही सत्तेसाठीच करत आहोत. आम्हाला सत्ता हवीच आहे. गोरगरिबांची कामे करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. सत्तेच्या माध्यमातून सातबारा कोरा करणार आहोत. शेतक-यांना कर्ज मुक्त करणारच हे युतीचे वचन आहे. 15 लाख सुशिक्षित तरुणांना शिष्यवृत्ती देणार आहे. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न सोडविला जाईल.

चिंचवड मतदार संघात बंडखोरी झाली आहे. याला शिवसेनेचा पाठिंबा नाही. शिवसैनिक बंडखोराचे काम करणार नसून बंडखोराना थारा नाही. लक्ष्मण जगताप यांचे काम चांगले असून महायुतीच्या माध्यमातून ते निवडून येतील असे ठाकरे म्हणाले.

Visit : Policenama.com