महाराष्ट्रासह तीन राज्यातील विधानसभेच्या तारखांची घोषणा दोन ते तीन दिवसांत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होतील अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यात याचवर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असून प्रथम महाराष्ट्रात व हरियाणात आणि नंतर झारखंडमध्ये निवडणूका होतील असे सुत्रांचे म्हणणे आहे. कदाचित गुरुवारी (दि.१२) देखील निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये दिवाळीपूर्वीच नवे सरकार स्थापन होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या घोषणे संदर्भात उद्या केद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. कदाचित गुरुवारी ही घोषणा केली जाऊ शकते असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात 288, हरियाणा 90 तर झारखंडमध्ये 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन नुकताच आढावा घेतला.

सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथकाने आज हरियाणा येथील मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली. दोन्ही राज्यांच्या गृह विभागांशी तसेच गृह मंत्रालयाशीही चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.

You might also like