दिल्लीतून HM शहा यांनी साधला बिहारवर ‘निशाणा’, पहिल्या व्हर्चुअल रॅलीत केला ‘शंखनाद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय जनता पार्टी कोरोना लॉकडाऊन दरम्यान बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली करणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शहा आपल्या पक्षासाठी बिहारमध्ये पहिली व्हर्चुअल रॅली ‘बिहार जनसंवाद’ला संबोधित करत आहेत.

शाह म्हणाले की, जनता कर्फ्यू भारताच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल की देशाच्या एका नेत्याच्या आवाहनावर कोणतेही पोलिस बळ न वापरता संपूर्ण देशाने घरात राहून आपल्या नेत्याच्या आवाहनाचा आदर केला. त्यांनी थाळी आणि घंटा वाजवायला सांगितले, दीप प्रज्वलन करण्यास सांगितले, लष्कराच्या सैनिकांकडून आकाशातून कोरोना वॉरियर्सवर फुलांचा वर्षाव करणे असो, हे सर्व पंतप्रधानांचेच आवाहन होते. काही लोकांनी याला प्रोपोगांडा म्हणाले, पण जे लोक हे बोलत आहेत त्यांना हे माहित नाही की हा प्रोपोगांडा नसून देश एक बनवण्याची मोहीम आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शहा म्हणाले की, मोदी सरकारने सहा वर्षात कोट्यवधी गरीबांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न केला, ज्याचा सर्वात मोठा फायदा माझ्या पूर्व भारतातील लोकांना झाला आहे. गृहनिर्माण, वीज, बँक खाती, आरोग्य सेवा, गॅस सिलिंडर, शौचालये या सर्व बाबी मोदी सरकारने २०१४-२०१९ च्या कार्य काळातच दिल्या होत्या. २०१९ मध्ये मोदी सरकारने जल विद्युत मंत्रालय स्थापन केले आणि देशातील २५ कोटी लोकांच्या घरात नळातून शुद्ध पाणी पोहोचवण्याची योजना सुरू केली.

विरोधकांवर निशाणा साधत शहा म्हणाले की, राहुल गांधी नेहमीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत बोलायचे. त्यांचे सरकार १० वर्षे होते, तर ते दावा करतात की सुमारे ३ कोटी शेतकर्‍यांचे सुमारे ६० हजार कोटी कर्ज माफ केले. ते म्हणाले की, पीएम मोदींनी किसान सन्मान निधीच्या माध्यमातून ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७२,००० कोटी रुपये दरवर्षी जमा करण्याची व्यवस्था केली.

आरसीईपीची चर्चा कॉंग्रेसने सुरू केली होती. त्यामुळे छोटे शेतकरी, मच्छीमार, छोटे व्यापारी, छोटे उद्योग या सर्वांचा नाश झाला असता. पण पंतप्रधानांनी छोटे शेतकरी, छोटे व्यापारी यांच्या हितासाठी निर्णय घेत आरसीईपी करारापासून भारताला वेगळे केले.

अमित शहा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर जेव्हा कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बिहारमधील जनतेनेच जेपी आंदोलन करून पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करण्याचे काम केले.

ते म्हणाले की, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की आतापर्यंत भारताचा जो विकास झाला, त्यात पश्चिम भारत आणि पूर्व भारताच्या विकासात मोठा फरक आहे. जीडीपीमध्ये पूर्वेकडील भारताचे योगदान स्वातंत्र्याच्या वेळी खूप जास्त होते, पण स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने सरकारे चालली त्यांनी पूर्व भारताच्या विकासाकडे पाठ फिरवली होती आणि परिणामी पूर्व भारत मागे पडला.

शाह म्हणाले की, भाजप सरकार हे गरिबांचे सरकार आहे. बिहारच्या भूमीनेच जगाला प्रथम लोकशाहीचा अनुभव दिला. या भूमीने नेहमीच भारताचे नेतृत्व केले आहे. या रॅलीचा निवडणुकीशी काही संबंध नाही. भाजपचा लोकशाहीवर विश्वास आहे.

अमित शहा म्हणाले की, आज मी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहे, तेव्हा काही लोकांनी थाळी वाजवून या रॅलीचे स्वागत केले. मला आवडले की त्यांनी उशिरा का होईना पंतप्रधान मोदींचे आवाहन स्वीकारले. राजकीय पक्षाची स्तुती करण्यासाठी ही रॅली नाही. कोरोनाविरूद्धच्या युद्धात लोकांना जोडण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ही रॅली आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण पाहता सरकारने कोणत्याही प्रकारच्या जमावावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासारखी कामेही व्हर्चुअलच केली जात आहेत.

यावर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. अमित शहा यांची ही ऑनलाइन रॅली बिहारमधील भाजपच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात म्हणून पाहिली जात आहे. बिहारमध्ये काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय जनता दलाने निवडणूक तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने तेजस्वी यादव यांनी नुकतीच बस रॅली काढली होती.