अर्णव गोस्वामींना दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस, जाणून घ्या काय होणार कारवाई ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दुसऱ्यांदा विशेषाधिकाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत याबाबत तातडीनं खुलासा करण्याची नोटीस विधीमंडळ सचिवालयानं बजावली आहे. विधानसभा परवानगीशिवाय विधानसभेतील कार्यवृत्त सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानं विशेषाधिकाराचा भंग झाल्याचं या नोटीसीत नमूद केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे विशेषाधिकार भंग आणि अवमानाची सूचना सादर केली होती. यावर विधानसभाध्यक्षांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरुद्ध विशेषाधिकार भंग का करण्यात येऊ नये अशी नोटीस 16 सप्टेंबरला पाठवली होती.

अर्णव सर्वोच्च न्यायालयात, आता हक्कभंगाचं पुढं काय ?
विधानसभा अध्यक्षांच्या परवानगी शिवाय विधानसभेतील कार्यवृत्त सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानं गोस्वामी यांना दुसरी हक्कभंगाची नोटीस पाठवली गेली आहे. त्यामुळं न्यायालयदेखील त्यांना आधी नोटीसीला उत्तर द्या असे आदेश देण्याची शक्यता जास्त आहे. याआधी अशा प्रकरणात अशाच प्रकारचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळं अर्णव गोस्वामींना हक्कभंग समितीसमोर हजर रहावं लागेल. हक्कभंग समितीपुढं उपस्थित न होणं हा देखील हक्कभंगच ठरतो.

हक्कभंग प्रस्ताव आणल्यावर पुढं काय ?
विधानसभेत हक्कभंग आणला गेल्यावर प्रकरण हक्कभंग समितीकडे जातं. या समितीत सर्व पक्षातील नेत्यांचा समावेश असतो. त्यांची निवड विधानसभेचे अध्यक्ष करतात. विधानसभेतील पक्षाच्या आमदारांच्या संख्येवरून समिती सदस्यांची निवड होते.