Pune : ‘सिम्बायोसिस’च्या विद्यार्थ्याना गुण वाढवून दिल्याप्रकरणी मूल्यमापन प्रमुखाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   प्रसिद्ध सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्याना गुण वाढवून दिल्याप्रकरणी पोलिसांनी मूल्यमापन प्रमुखाला अटक केली आहे. गुण वाढ प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यात 178 विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवले आहेत. प्रमुखाला न्यायालयाने 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मूल्यमापन प्रमुख संदीप रामकृष्ण हेंगळे (वय ४९, रा. गुलमोहोर अपार्टमेंट, नवश्या मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात सुमीत कुमार (रा. गोल नाका, अंबरपेठ, हैद्राबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या संस्थेतील अधिकारी नामदेव कुंभार यांनी या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 2018 व 19 शैक्षणिक वर्षात हा प्रकार घडला आहे.

आरोपी हेंगळे हे या विभागाचा हेड आहेत. दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या बनावट केस हिस्ट्री तयार करून त्यांचे गुण वाढवले. एका विद्यार्थ्याचे पेपरचे गुण वाढवल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने व अमित याने एकूण 178 विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवले असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी संस्थेमार्फत त्याची प्राथमिक चौकशी केली. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी हेंगळे यांना आज अटक करत न्यायालयात हजर केले. यावेळी संगणक विभागाचा गैरवापरकरून गुण वाढवले आहेत. तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने हेंगळे यांच्याकडून संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल व इतर साहित्य जप्त करायचे असल्याचे ऍड. ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयात सांगितले. गुन्हा करण्यासाठी त्यांनी आणखी कोणाची मदत घेतली व यात कोण सामील आहे. हेंगळे, कुमार आणि विद्यार्थी हे संपर्कात कसे आले याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी मोरे यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने हेगळे यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.