‘त्यांनी’ माणूसकी दाखवत आतापर्यंत ‘कोरोना’च्या 800 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी केली ‘मदत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशातच नव्हे तर मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव अधिक होत असल्याने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आपल्याला आढळत आहे. अशातच जर कोरोनाग्रस्त रूग्णाचे निधन झाले तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण आणि कसे करणार ? हा प्रश्न अनेकांना पडत होता. कारण, हा कोरोनाचे संक्रमण कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यामुळे कोरानाग्रस्त रूग्णाचे निधन झाले तर अशा मृतदेहाजवळ नातेवाईकसह अनेकांना अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न पडत होता. मात्र, यातच काहींनी पुढाकार घेऊन स्वत:ची तमा न बाळगता आतापर्यंत ‘त्यांनी’ सुमारे 800 कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. यात त्यांनी जात-धर्म न पाहता सर्व जाती-धर्मीयांच्या लोकांना सहकार्य केले आहे. त्यांच्या जाती-धर्मीयांच्या पध्दतीनुसार अंत्यसंस्कार करून त्यांच्या नातेवाईकांना देखील सहाय्य केले आहे.

यावेळी मुंबईतील सात जणांनी अशाप्रसंगी गरजूंना मदत करणे, ही आपली नैतिक आणि माणुसकी म्हणून सामाजिक जबाबदारी समजून स्वत:ला त्यात झोकून दिले.

सुरुवातीला अवघ्या सात जणांनी सुरु केलेल्या याला अधिक पाठबळ मिळत गेले आणि आता तब्बल दोनशेहून अधिक लोक यात सहभागी झालेत. यातून आतापर्यंत सुमारे आठशेपेक्षा अधिक जणांवर अत्यंसंस्कार करून आवश्यक ती मदत केली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष अंत्यसंस्कार केले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे, जव्हार, मोखाडा यासह विविध भागात रुग्णांना मदत केली आहे. एकीकडे रुग्णवाहिकेसाठी मनमानी पध्दतीने भाडे आकारले जात असताना या गटाने ही सर्व सुविधा विनामूल्य पुरवली आहे. हे मदतकार्य करताना कोणत्याही रुग्णाचा, मृतदेहाचा धर्म किंवा जात आडवी आलेली नाही. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना मदत केली आहे.

जामा मशीद ट्र्स्टचे अध्यक्ष शोएब खतीब, इक्बाल ममदानी, साबीर निर्बन, अँड इरफान शेख, सलीम पारेख, सोहेल शेख, रफिक सोराटिया या सात जणांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आता मुंबईसह परिसरातील दोनशेहून अधिक मुस्लिम तरुण यात सहभागी झाले आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाजवळ जाण्यास कुटुंबीय नकार देत. काही प्रकरणात घरातील एकाचा कोरोनाने मृत्यू आणि इतर कुटुंबिय क्वॉरंटाईन असल्याने मृतदेहावर अंतिम संस्कार करु शकत नव्हते. काही प्रकरणात निधन झालेल्या व्यक्तीचे सर्व कुटुंबीय गावी असल्याने अंत्यसंस्काराबाबत समस्या उद्भवल्याचे समोर येत होते.

याची माहिती मिळाल्यावर या तरुणांनी मुस्लिम समाजातील अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास प्रारंभ केला. मात्र, कालांतराने ही समस्या सर्वच धर्माच्या नागरिकांना भेडसावू लागल्याचे समोर आले. त्यामुळे या तरुणांनी आपले कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. त्यांनी सहा जुन्या रुग्णवाहिका दुरुस्त करून त्या वापरात आणल्या. रुग्णांना रुग्णालयात पोहचविणे, मृतदेह कब्रस्तान, स्मशानात पोहचविणे, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे, अशी विविध कामे या गटाने करण्यास सुरूवात केली. हजारो जणांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली.

याबाबत इक्बाल मदानी म्हणाले, माणुसकी आणि सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही या कामाला सुरूवात केली आणि टप्प्याटप्प्याने आम्हाला अधिक जणांचे पाठबळ मिळले. सुरुवातीला अनेक प्रकरणात कुटुंबिय मृतदेहासोबत येण्यास टाळाटाळ करत होते. त्यावेळी आम्ही अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्ती हिंदू असेल तर त्यांच्यावर आम्ही हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केले. आमच्या टीमने सुरक्षेसाठी पीपीई कीट हातमोजे, सँनिटायझर, मास्क यांचा आवश्यकतेनुसार वापर केला. तसेच सरकारी नियमांचे पालन करत ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.