दुर्दैवी ! कोरोना काळात धारावीत लढणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात सगळ्यात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीत चोख कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचे गुरुवारी (दि. 11) सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नांगरे यांच्या निधनामुळे पोलीस दलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान नांगरे यांनी 2 दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यावेळी तत्कालीन धारावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांनी चोख कर्तव्य पार पाडले होते. कोरोनाच्या काळात नांगरे यांनी अतुलनीय काम केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या कामाबद्दल सत्कार केला होता. जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नची नोंद घेतली होती. त्यामुळे रमेश नांगरे यांना अनेक सन्मानाने सन्मानित केले होते.