70,000 रुपयाची लाच घेताना सहाय्यक अभियंता ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याच्या कामाचे बील मंजूर करुन दिल्याच्या मोबदल्यात 70 हजार रुपयाची लाचेची मागणी करुन लाच स्विकारणाऱ्या सार्वजनीक बांधकाम विभाग, सुरगाणा येथील सहाय्य अभियंत्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. गंगाराम सिताराम भोये असे सहाय्यक अभियंत्याचे नाव असून लाचेची मागणी करुन लाच स्विकारल्या प्रकरणी आज (सोमवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिताराम भोये याच्यावर यापूर्वी लाच स्विकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे गावात केलेल्या रस्त्याच्या कामाचे बील मंजूर करुन दिल्याच्या मोबदल्यात गंगाराम भोये याने 70 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने 17 फेब्रुवारी 2021 रोजी पडताळणी केली असता भोये याने तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाच स्विकारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आज मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गंगाराम भोये याला 7 सप्टेंबर 2009 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी भोये याच्यावर कळवण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.