धक्कादायक ! सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबळजनक घटना घडली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक संदिप माने असे आत्महत्या केलेल्या पोलीसाचे नाव आहे. या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदिप माने हे पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते रजा घेऊन महाड तालुक्यातील शिरवली येथे घरी गेले होते. आज (रविवार) सकाळी अकराच्या सुमार त्यांनी घरामध्ये कोणी नसताना घराच्या छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. घरातील लोक आल्यानंतर संदिप यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणाची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.

सहायक पोलीस उपनिरीक्षक संदिप माने यांनी मुलाचे आजारपण आणि घरगुती वादाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार एन.ए. कदम पुढील तपास करीत आहेत.