लाच प्रकरणातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल व डिझेल चोरी प्रकरणात न अडकवण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रकाश नाईक यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. रावसाहेब लोखंडे असे निर्दोष मुक्तता झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. हा प्रकार 6 एप्रिल 2010 मध्ये घडला होता.

रावसाहेब लोखंडे हे एप्रिल 2010 मध्ये आर. सीएफ, पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी सी. आर. यादव विरुद्ध डिझेल व पेट्रोल चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. लाच प्रकरणातील तक्ररारदार हे यादव याच्या ओळखीचे असल्याने त्यांना त्याचा ठावठिकाणा माहित असेल या उद्देशाने त्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

तक्रारदार याने आपल्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेत डांबून ठेवले. तसेच डिझेल चोरी प्रकरणात अडवण्याची धमकी देत 50 हजार रुपयाची लाच मागितल्याचे आणि तडजोडीमध्ये 25 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर लोखंडे यांना 7 एप्रिल 2010 रोजी 15 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तत्पूर्वी तक्रारदार यांच्या मित्राने 6 एप्रिल 2010 रोजी लोखंडे यांना दहा हजार रुपये दिल्याचे सरकारी पक्षाने म्हटले होते.

मुंबई येथील विशेष न्यायालयाने लोखंडे यांना लाच प्रकरणात दोषी ठरवून त्यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. लोखडे यांच्यावतीने ॲड. अभिषेक अवचट यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून रावसाहेब लोखंडे यांची न्यायमुर्ती प्रकाश नाईक यांनी निर्दोष मुक्तता केली.