तृतीयपंथ्याकडून (देवदासी) २५ हजारांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्ह्यामध्ये भावाला अटक न करण्यासाठी एका सहायक पोलीस निरीक्षकाला तृतीय पंथ्याकडून (देवदासी) २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली. एका तृतीयपंथ्याकडून (देवदासी) पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दिपक हरीभाऊ खरात (वय-४८) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका तृतियपंथ्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या मामेभावावर दुखापतीचा गुन्हा गोवंडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास दिपक खरात हे करीत आहे. तक्ररारदार यांचा भाऊ सध्या जामीनावर असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करता गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी खरात याने तृतियपंथ्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी खरात याने २५ हजार रुपयांची लाच स्विकारण्याचं कबूल केले. आज गोवंडी पोलीस ठाण्यात पथकाने सापळा रचला. तृतियपंथ्याकडून लाच स्विकारताना खरात याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून खरात विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.