काय सांगता ! होय, संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी, सहाय्यक पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबीत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळं सर्व जनता त्रस्त आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाविरूध्द लढा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यापुर्वीच महाराष्ट्रात संचारबंदी केल्याचं जाहीर केलं होतं. अशा संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी थेट पैशाची मागणी झाल्याची घटना सोलापूर येथे घडली आहे. पैशाची मागणी केल्यानंतर सोलापुरमधील औद्योगिक पोलिस चौकीत कर्तव्य बजाविणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकास तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे असं निलंबीत करण्यात आलेल्या अधिकार्‍याचं नाव आहे. सोलापूरमध्ये संचारबंदी चालू असतानाच विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या विरूध्द कारवाई न करण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांनं पैशांची मागणी केल्याची माहिती समोर आली. याबाबतची तक्रार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यंत पोहचली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी सहाय्यक निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.