सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा हृदय विकाराने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोलीमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे चिंचवडचे भूमीपुत्र जिगरबाज सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा निधन हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे (दि. ८ मार्च) झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी चिंचवड येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.

योगेश गुजर हे चिंचवडमधील दळवी नगरचे रहिवासी आहेत. त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी २०१४ साली निवड झाली होती. निवड झाल्यानंतर त्यांची पहिलीच नेमणूक गडचिरोलीत झाली होती. त्यानंतर नक्षलग्रस्त परिसरात त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी नक्षलविरोधी कारवायांमध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षिस म्हणून सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती दिली होती. दोन वर्षांपुर्वी त्यांचा विवाह झाला होता.

मात्र गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना शुक्रवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर चिंचवड येथील लिंकरोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका जिगरबाज अधिकाऱ्याला गमविल्याने चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गुजर यांचा संशयास्पद मृत्यू