PM नरेंद्र मोदी आज काय उत्तर देणार ? शेतकरी आंदोलन, कृषि बिलाबाबत काय भूमिकेबाबत उत्सुकता

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत उत्तर देणार आहेत. लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चा अद्याप अपूर्ण आहे. राज्यसभेत अभिभाषणावरील चर्चा विना अडथळा सुरु राहिल्याने शुक्रवारी ती पूर्ण झाली होती. त्यामुळे आज सकाळी साडेदहा वाजता राज्यसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देणार आहे.

सध्या देशात शेतकरी आंदोलन हाच मुख्य मुद्दा चर्चेत आहे. गेल्या ७० दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून सरकारला त्यावर अजूनही तोडगा काढता आलेला नाही. त्याचबरोबर २६ जानेवारी रोजी आंदोलनाला लागलेले हिसंक स्वरुप, लाल किल्ल्यावर नेलेली ट्रॅक्टर रॅली असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात या मुद्द्यांवर भर असण्याची शक्यता आहे. एक फोन कॉलपासून दूर असल्याचे वक्तव्य मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. पण, त्यानंतर अजूनपर्यंत हा कॉल झालाच नाही. अशा सर्व मुद्दांना मोदी आपल्या भाषणात स्पर्श करतीलच. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका असल्याने ममता बनर्जी यांच्यावर टिका करण्याची ते संधी साधल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले जात आहे.