पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कड्यामध्ये 150 ‘कोरोना’मुक्त पोलीस

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल, त्यावेळी त्यांच्याभोवती विशेष सुरक्षाकडे असणार आहे. या सुरक्षा कड्यामध्ये कोरोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस असतील, असे राज्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी सांगितले आहे.

भूमिपूजन सोहळयाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येमध्ये राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. या पोलिसांमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. पुढचे काही महिने कोरोनाच्या धोक्यापासून पंतप्रधान मोदींचा बचाव करणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तंदुरुस्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे हा प्रोटोकॉलचा भाग आहे. सध्याच्या या दिवसांमध्ये करोना योद्ध्यांपेक्षा अधिक तंदुरुस्त कोण असू शकतात? असे यूपीचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक कुमार म्हणाले. कोरोनामुक्त झालेले हे 150 पोलीस सुरक्षेच्या पहिल्या स्तरामध्ये असणार आहेत. यासंदर्भात 29 जुलैला राज्याचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांना पत्र लिहिले होते. कोरानातून बर्‍या झालेल्या 150 पोलिसांना अयोध्येला पाठवण्याची विशेष विनंती केली असे दीपक कुमार यांनी सांगितले.