छत्तीसगड : नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीत नंतर अद्याप 15 जवान बेपत्ता

रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद झाले असून ९ नक्षलवादी ठार झाले आहेत. तीन तास सुरु असलेल्या चकमकीत तब्बल ३० जवान जखमी झाले असून अद्याप १५ जवान बेपत्ता आढळून आले आहेत.

राज्याचे पोलीस उपमहानिरीखक (नक्षलविरोधी मोहिम) ओ. पी. पाल यांनी सांगितले की, बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील दक्षिण बस्तर जंगलात शुक्रवारी सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहिम सुरु केली. त्यात २ हजारांहून अधिक केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा कमांडो, जिल्हा राखीव दल, आणि विशेष कृती दल यांचा समावेश आहे. पाच ठिकाणाहून एकाचवेळी ही मोहीम सुरु करण्यात आली. तारेम येथून निघालेल्या एका पथकांची शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ पीएलजीए नक्षलवाद्यांशी गाठ पडली. सुमारे तीन तास ही चकमक सुरु होती. या चकमकीत ९ नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. त्याचवेळी नक्षलवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात ५ जवान शहीद झाले. त्या पार्टीच्या सरंक्षणार्थ गेलेल्या पोलीस पार्टीला या जवानांचे मृतदेह मिळून आले आहे. त्याचबरोबर या चकमकीत ३० जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांपैकी २३ जवानांना बिजापूर हॉस्पिटलमध्ये तर, ७ जणांना रायपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अजून १५ जवान बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे. या १५ जवानांचा जंगलात शोध घेतला जात आहे.