युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंच्या मनसेला ‘रेड’ सिग्नल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाल्याचं वृत्त आहे. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसे आणि भाजपची सध्या तरी युती शक्य नाही.

राज ठाकरेंसोबत बैठक झाली का असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत असं सांगत उत्तर देणं टाळलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचं कोणतीही चिन्ह नाही. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. आणि जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. मनसेने भूमिका आणि कार्यपद्धती बदलली तर युतीबाबत चर्चा होईल,”.

Advt.

दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत दिले होते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीबद्दल मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. कधी मराठी माणसांसाठी, कधी हिंदूंसाठी, तर कधी सर्वांसाठीच मनसे धावून गेली. परंतु कोणताही एक समाज मनसेचा होऊ शकला नाही. त्यामुळे राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याचे बोलले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/