पाकिस्तानात ‘हाहाकार’ ! पेट्रोल पेक्षाही दूध झालं ‘महाग’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये महागाईमुळे हाहाकार माजला आहे. मंगळवारी मोहरमला पाकिस्तानच्या बर्‍याच शहरांमध्ये दुधाची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त होती. पाकिस्तानी माध्यमांनुसार कराची आणि सिंध प्रांतात लोकांनी प्रतिलिटर 140 रुपये किमतीला दूध विकत घेतले.

दुधापेक्षा स्वस्त होते पेट्रोल

पाकिस्तानमध्ये दुधापेक्षा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळत आहेत. यावेळी पेट्रोल 113 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल प्रति लिटर 91 रुपये मिळत आहे. मोहरममुळे पाकिस्तानात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या प्रसंगी मिरवणुकीत भाग घेणाऱ्यांना लोकांना वेगवेगळ्या साबील (स्टॉल) च्या माध्यमातून दुध , खीर इत्यादी बनवून वाटप केले जाते.

कराचीमध्ये लोक दूध प्रतिलिटर 94 रुपये खरेदी करतात. कराचीचे आयुक्त इफ्तिखार शालवानी यांनी किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीही केले नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे. या आधीही पाकिस्तानमध्ये बकरीइदच्या दिवशी व इतर सणांना महागाईचा आगडोंब पहायला मिळाला होता.

दिवसेंदिवस वाढतच चालली आहे महागाई

पाकिस्तानमधील सामान्य लोकांचे आयुष्य दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात महागाई दर गेल्या 7 वर्षांपेक्षा सर्वाधिक होता. पाकिस्तानमध्ये महागाई 11 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. ती 11.6 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पाकिस्तानी चलन कमकुवत झाल्यामुळे आणि आयएमएफच्या अटी मान्य केल्यामुळे महागाई वेगाने वाढत आहे. पाकिस्तानच्या सेंट्रल बँकने येत्या काही दिवसांत आणखी महागाईचा अंदाज वर्तविला आहे.