त्यावेळी मनमोहनसिंग देणार होते ‘राजीनामा’, अहलुवालिया यांनी केला ‘गौप्यस्फोट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात मंचावर येऊन अध्यादेश फाडला, त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट तत्कालिन योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंह अहलुवालिया यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ‘बॅकस्टेज / द स्टोरी बिहाइन्ड इंडिया हाई ग्रोथ इयर्स’ या आपल्या नव्या पुस्तकात हा गौप्यस्फोट केला आहे. हे पुस्तक रविवारी प्रकाशित करण्यात आले. ही घटना २०१३ मध्ये घडली होती.

डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात प्रस्तावित असलेल्या एका विधेयकावर नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांनी त्या विधेयकाची प्रत पत्रकार परिषदेत फाडून टाकली होती. दोषी खासदारांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे विधेयक तयार करण्यात आले होते.

याविषयी अहलुवालिया यांनी पुस्तकात लिहिले आहे की, त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग व आम्ही अमेरिकेत होतो. माझे भाऊ संजीव जे निवृत्त आयएएस आहेत. त्यांनी एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर कठोर टिका करण्यात आली होती. त्यांनी तो लेख मला ई मेल केला होता. ही बाब सिंग यांना आपल्याकडून सर्वप्रथम कळावी, असे मला वाटल्याने मी तो लेख घेऊन मनमोहनसिंग यांना दाखविला. त्यांनी हा लेख संपूर्ण वाचला. त्यानंतर काही वेळ त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने त्यांनी मला अचानक विचारले की, मी राजीनामा दिला पाहिजे, असे तुम्हाला वाटते का?.
अहलुवालिया यांनी त्यात पुढे म्हटले की, काही वेळ मी विचार केला. या मुद्द्यावर राजीनामा देणे उचित नाही, असे त्यांना सांगितले, असे त्या पुस्तकात म्हटले आहे.