‘त्या’ वेळी लढा म्हणत होता, आता का माघार घ्यायला सांगताय ? बंडखोरांचा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हीच आम्हाला मतदारसंघात तयारी करायला सांगितली. त्यानुसार गेली २ वर्षे झोकून देऊन काम करीत होतो. आता डोक्यावर दुसऱ्याला आणून बसविले आणि आता माघार घ्यायला का सांगताय? हे उत्तर होते बंडखोरांचे. राज्यात सर्वाधिक बंडखोरीचा सामना भाजपाला सध्या करावा लागत आहे. शिवेसेनेला तर मातोश्रीच्या दारातच बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वैयक्तिकरित्या फोन करुन माघार घ्यायला सांगत होते.

अगोदर विनंती, नंतर समजावून आणि त्यानंतर धमकावणी असे सर्व प्रकार केल्यानंतरही काही जणांनी आपला बंडखोरीचा निर्धार कायम ठेवताना त्यांना थेट या शब्दात उत्तर दिले. काही विद्यमान आमदारांनीही माघार घेण्यास नकार दिला. आमची चांगली कामगिरी असूनही आम्हाला संधी का नाकारली,  यावेळी लोकांकडून मोठा दबाव आहे. त्यामुळे माफ करा. माघार घेऊ शकत नाही, असे काहींनी नेतृत्वाला सुनावले.

महायुतीतील बंडखोरांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपा व शिवसेना यांच्या विरोधात कोणी कोणी बंडखोरी केली याची यादी दोन्ही पक्षांनी केली होती. ती एकमेकांना देण्यात आली. मातोश्रीवरुन यादी घेऊन शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी वर्षावर जाऊन यादी दिली. त्यानंतर वर्षा आणि मातोश्रीवरुन दोन दिवस सर्व बाजूने बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. त्याला जवळपास ५० टक्के यश आले. अजून किमान ३० मतदारसंघात थेट एकमेकांच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी कायम आहे. याशिवाय भाजपाच्या काहींनी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे.

Visit  :Policenama.com