अटलजींकडे त्यावेळी उपचारासाठी नव्हते पैसे, मृत्यूनंतर मागे ठेवली ‘इतकी’ संपत्ती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास संपूर्ण देशाला माहिती आहे. मात्र, त्यांची एकच बाजू माहित असली तरी, एकेकाळी अटलजी यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते. त्यावेळी त्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मदत केली होती.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संपत्तीबाबत बोलताना सांगितले होते की, 1987 मध्ये किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्याएवढेही पैसे नव्हते. तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची मदत केली. राजीव गांधी यांनी केलेली मदत ते विसरले नाहीत. त्यांनी सार्वजनिक सभांमध्येही राजीव गांधी यांचे मदत केल्याबद्दल आभार मानले होते. एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण मालमत्ता 14.05 कोटी एवढी होती. मात्र 2004 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाजपेयी यांची एकूण संपत्ती 50 लाखांच्या आसपास होती.

काय आहे 2004 च्या प्रतिज्ञापत्रात ?
अटलबिहारी वाजपेयी यांनी 2004 मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीशी निगडीत जे प्रतिज्ञपत्र निवडणूक आयोगाला दिले होते, त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 58 लाखांच्या आसपास होती. वाजपेयी यांचे स्टेट बँकेत दोन अकाऊंट होते. त्यातील एका अकाऊंटमध्ये 20 हजार तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये 3 लाख 82 हजार 886 रुपये 42 पैसे एवढी रक्कम होती. याच बँकेच्या आणखी एका खात्यामध्ये 25 लाख 75 हजार 562 रुपये 50 पैसे एवढी रक्कम होती. त्यांच्याकडे 1 लाख 20 हजार 782 रुपयांचे 2400 युनिट बॉण्डही होते. हे यूनिट यूटीआय-1991 आणि 1993 च्या नॅशनल सेव्हिंग योजनेअंतर्गत देण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडे 22 लाख किंमतीचे एक घर दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलाश येथे होते. याशिवाय ग्लालियरमधील त्यांच्या मूळ घराची किंमत सहा लाख होती.