काँग्रेसच्या कोट्यातून अटलबिहारी वाजपेयी यांची ‘भाची’ राज्यसभेची ‘दावेदार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसच्या तिकिटासाठी दावेदार म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांचेही नाव समाविष्ठ आहे. मात्र, पक्षाचा एक मोठा वर्ग त्यांना तिकीट देण्याच्या विरोधात आहे. प्रदेश कोट्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. मंगळवारी याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी एका जागेवर सध्या भाजपचे रणविजयसिंग जुदेव आणि दुसऱ्या जागेवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा सदस्य आहेत.

विधानसभेत संख्याबळाच्या आधारे आता दोन्ही जागा कॉंग्रेसच्या खात्यात जाणार आहेत. यामुळेच कॉंग्रेसचे दावेदार रायपूर ते दिल्ली अशी धावपळ करू लागले आहेत. कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोतीलाल वोरा यांना तिकीट मिळणे कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत करुणा शुक्लासह राज्य संघटनेचे सरचिटणीस गिरीश देवांगन यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रदेश संघटनेच्या कोट्यातून देवांगन व्यतिरिक्त सरचिटणीस आणि संप्रेषण विभागाचे अध्यक्ष शैलेश नितीन त्रिवेदी आणि तीन ज्येष्ठ आमदारांच्या नावांचीही चर्चा होत आहे. यामध्ये एक सर्वसाधारण, एक ओबीसी आणि आदिवासी वर्गातून आहे. जात समीकरणाच्या आधारे भरपूर नेते आपली दावेदारी सिद्ध करत आहेत. राज्य संघटनेचे प्रभारी पी. एल. पुनिया आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल ते केंद्रीय संघटनेपर्यंत दावेदार आपापल्या स्तरावर लॉबिंग करीत आहेत.

सहा वर्षाआधी पार्टीत आल्या होत्या करुणा
करुणा शुक्ला यांनी भाजपा सोडली आणि सुमारे सहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर पक्षाने त्यांना प्रथम बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून आणि नंतर राजनांदगाव सीटवरुन गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या विरोधात उभे केले होते. पण त्या दोन्ही वेळेस पराभूत झाल्या. यामुळे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते त्यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या विरोधात आहेत. त्याचवेळी, काँग्रेसच्या एका गटाचे असे म्हणणे आहे की, राज्यसभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयातल्या करुणा यांना पाठवून भाजपला काहीसे अस्वस्थ स्थितीत आणता येईल.

संघटनेने हाय कमांडला सोपवली जबाबदारी
इकडे राज्य संघटनेने कुणाच्या नावावर मोहर लावावी याची जबाबदारी पक्षाच्या हाय कमांडकडे सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम म्हणाले की राज्यसभेवर कुणाला पाठवायचे याचा अधिकार हाय कमांडकडे आहे. हायकमांड ज्या कुणाचे नाव सांगतील त्यांच्यासोबत आम्ही राहू.