अटल पेन्शन योजना : SBI चे खातेधारक असाल तर नेट बँकिंगद्वारे घेऊ शकता लाभ, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेतून पेन्शनची व्यवस्था केली जाते. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत शेकडो लोक या योजनेत सामील झाले आहेत. वृद्धावस्थेचा आधार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अटल पेन्शन योजनेत सामील होणाऱ्यांची संख्या 2.4 कोटींवर पोहोचली आहे. या योजनेत ग्राहकांना महिन्याला 1000 ते 5000 रुपयांच्या दरम्यान निश्चित पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम वयाच्या 60 वर्षांपर्यंत अटल पेन्शन योजनेत दिलेल्या योगदानावर अवलंबून असते.

या लोकांना मिळणार नाही लाभ :

आयकरांच्या कक्षेत येणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही. तसेच, केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही याचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर, ईपीएफ आणि ईपीएस यासारख्या योजनांचा आधीच लाभ घेत असलेले लोकही यात समाविष्ट होऊ शकत नाही. याउलट बँक किंवा टपाल कार्यालयात बचत खाते असलेले 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेचा भाग बनू शकतात.

जर आपल्याकडे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये खाते असेल तर आपण नेट बँकिंगद्वारे या योजनेत सामील होऊ शकता.

– सर्वात आधी एसबीआय नेट बँकिंगमध्ये लॉगिन करा

– ‘ e-Services’ लिंकवर क्लिक करा

– नवीन विंडोमध्ये दिसणार्‍या Social security scheme च्या लिंकवर क्लिक करा.

– आता APY वर क्लिक करा

– खाते क्रमांक, नाव, वय इत्यादी प्रमाणे विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.

– निवृत्तीवेतनापैकी एक पर्याय निवडा, उदाहरणार्थ प्रत्येक महिन्यात 5000 किंवा 1000 रुपये.

– असे केल्यावर आपल्या वयाच्या आधारे आपल्या महिन्याच्या निश्चित योगदानाबद्दल निर्णय घेतला जाईल.