आता कधीपण वाढवू किंवा कमी करू शकता पेन्शनची रक्कम, ‘या’ सरकारी योजनेच्या 2.28 कोटी खातेदारांना PFRDA नं दिली नवी सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अटल पेन्शन योजनेंतर्गत आता वर्षात कधीही पेन्शन वाढवता येईल किंवा कमी करता येईल. ही पेन्शन योजना अधिक आकर्षक करण्यासाठी पीएफआरडीएने ही तरतूद केली आहे. या नव्या सुविधेचा लाभ या योजनेतील नोंदणीकृत २.२८ कोटी ग्राहकांना होणार आहे. अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन करणार्‍या पीएफआरडीएने सर्व बँकांना वर्षाच्या कोणत्याही वेळी पेन्शनच्या रकमेत कपात किंवा वाढ करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नवीन सुविधा १ जुलैपासून लागू झाली आहे. मात्र एका आर्थिक वर्षात एकदाच या सुविधेचा लाभ घेता येईल. यापूर्वी केवळ एप्रिलमध्ये पेन्शनची रक्कम बदलणे शक्य होते. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सुविधेअंतर्गत अटल पेन्शन योजनेचे ग्राहक त्यांच्या उत्पन्नानुसार पेन्शन योजनेत बदल करू शकतील.

१ जुलैपासून सुरु होणार ऑटो डेबिटची सुविधा
पीएफआरडीएने म्हटले आहे की, १ जुलै २०२० पासून एपीवाय योगदानासाठी ऑटो डेबिट सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारी दरम्यान ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पीएफआरडीएने ११ एप्रिल २०२० रोजी एक परिपत्रक जारी करून ३० जून 2020 पर्यंत ऑटो डेबिट सुविधा रोखली होती. सद्य प्रणाली अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान सर्व प्रलंबित योगदान जर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ग्राहकांच्या बचत खात्यातून वजा केल्यास त्यांना कोणताही दंड भरावा लागणार नाही.

अटल पेन्शन योजनेबाबत जाणून घ्या
सरकारने मे २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती. पीएफआरडीएमार्फत ही योजना राबवली जाते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सामील होऊ शकतो. यासाठी व्यक्तीचे कोणत्याही बँक किंवा टपाल कार्यालयात बचत खाते असले पाहिजे. या योजनेंतर्गत ग्राहकाच्या ६० वर्षानंतर पेन्शन रक्कम मिळते. ही रक्कम १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत असू शकते. पेन्शनची रक्कम एपीवायच्या योगदानावर अवलंबून असते.