‘बर्थ डे पार्टी पडली महागात ! धावपटू उसेन बोल्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन – ऑलिम्पिक चॅम्पियन धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जमैका येथे स्वतःच्या 34 व्या वाढदिवशी इंग्लिश फूटबॉलपटू रहीम स्टर्लिंगसह इतर पाहुण्यांसह मेजवानी केली होती. त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

उसेन बोल्टची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली होती. त्याने स्वत: कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे व्हिडीओ पोस्ट करून सांगितले. 21 ऑगस्ट रोजी बोल्टने वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगच्या प्रोटोकॉलचे पालन केले नव्हते. त्यानंतर त्याने व्हिडिओ शेअर करत ’मी कोरोना पॉझिटिव्ह असून शनिवारी माझी चाचणी करण्यात आली. मी सध्या आयसोलेशनमध्ये राहत आहे’असे जाहीर केले आहे. बोल्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रहीम स्टर्लिंगला मोठा धक्का बसला आहे. 25 वर्षांचा फॉरवर्ड रहिम स्टर्लिंग हा प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे जो प्रीमियर लीग क्लबमध्ये मँचेस्टर सिटी आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो. 11 जागतिक आणि 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बोल्टने 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर रिलेमध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे.