कुणाल पांड्याकडून अतीत शेठने हिसकावली लाइमाईट ! 16 चेंडूत बनवले अर्धशतक, मारले 7 षटकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढविरूद्ध सूरतच्या पिठवाला स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफीअंतर्गत खेळण्यात येत असलेल्या मॅचमध्ये बडोद्याचा कर्णधार कुणाल पांड्या शतक ठोकण्यात यशस्वी झाला. कुणालने 100 चेंडूत 20 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 133 धावा केल्या, परंतु मॅचच्या दरम्यान, चर्चेत राहिला तो अतीत शेठ. मध्यक्रमातील फलंदाज अतीतने 7 व्या विकेटसाठी कुणालसोबत 35 चेंडूत 90 धावा केल्या होत्या. या दरम्यान अतीत चर्चेत राहिला कारण त्याने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

अतीतने विकेटच्या चारही बाजूंना मोठे फटके लगावले आणि 318 च्या स्ट्राइक रेटने 51 धावा बनवल्या. हे विजय हजारे ट्रॉफीतील सर्वात वेगवान अर्धशतकांपैकी एक आहे. अतीत आणि कुणालच्या याच खेळीमुळे बडोदाने निर्धारित 50 षटकांत 332 धावा स्कोअर बोर्डवर झळकवल्या. मात्र, यापूर्वी विष्णू सोलंकीने सुद्धा शानदार खेळ दाखवत 78 धावा केल्या होत्या. सोलंकीच्या या धावा तेव्हा आल्या जेव्हा बडोदाचा सलामीचा फलंदाज देवधर 12 तर समित पटेल 13 धावांवर आऊट झाले होते.

अतीत अर्पित शेठ 25 वर्षांचा आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंत ऑलराऊंड परफॉर्म केला आहे. 38 लिस्ट ए च्या तुलनेत त्याच्या नावावर 238 धावा तर 52 विकेटची नोंद आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या दरम्यान त्याने 4 विकेट सुद्धा घेतल्या आहेत.