पुण्यात एटीएम कटरने कापून १० लाख रुपये लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे स्वीच बंद करून चोरट्यांनी एटीएम मशीनच कटरच्या साह्याने कापून १० लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार सहकारनगर परिसरात सोमवारी सायंकाळी उघडकिस आला. सीसीटिव्ही बंद झाल्याने कोणतीही मुव्हमेंट एटीएममध्ये दिसत नसल्याने बँकेला हा प्रकार लक्षात आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सहकार नगर परिसरात सेंट्रल बँक ऑफ इंडीयाचे एटीएम आहे. या एटीएममध्ये मागील दोन दिवसांपासून सीसीटीव्हीत काही हालचाल दिसत नव्हती त्यामुळे बँकेचे अधिकारी सोमवारी दुपारी तेथे दाखल झाले. त्यांनी पाहिले तेव्हा एटीएमचे शटर बंद होते. शटरवर करून त्यांनी आत प्रवेश केला आणि पाहिले तर समोर एटीएम मशीन चक्क कटरने कापलेली त्यांना दिसली. त्यांनी पाहणी केली तेव्हा त्यातील रोकडही गायब होती.

त्यानंतर त्यांनी सीसीटिव्ही तपासले तेव्हा त्याचे मेन स्विचही बंद होते. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान सीसीटिव्ही बंद असल्याने लुटतानाचे चित्रिकरण दिसले नाही. तर चोरट्यांनी रोकड लंपास केल्यानंतर शटर बंद करून ठेवले होते. त्यामुळे लोकांनाही ते तांत्रिक बिघाडामुळे बंद असेल असे वाटले होते. त्यामुळे कोणालाही ते समजले नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सहकारनगर पोलीस ठाण्यात सुरु आहे.