ATM कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

शिरवळ : पोलिसनामा ऑनलाईन – एटीएम सेंटरमध्ये येणाऱ्या वृद्ध, तसेच महिलांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची अदलाबदल करून परस्पर रक्कम काढून फसवणूक करणारी चार जणांच्या आंतरराज्य टोळीला गजाआड करण्यात शिरवळ पोलिसांना यश मिळाले आहे. प्रदीप साहेबराव पाटील (२९), किरण कचरू कोकणे (३५, दोघे रा. म्हारूळगाव, ता. कल्याण, जि. ठाणे), विकी राजू वानखेडे (२१, रा. भय्यासाहेब आंबेडकरनगर, उल्हासनगर), महेश पांडुरंग धनगर (३१, रा. ब्राह्मणपाडा, उल्हासनगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत त्यांच्याकडून ६२ एटीएम कार्ड, ८ हजार रुपयांची रोकड आणि एक कार जप्त केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील भोंगवली येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये रोकड काढण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांचा मित्रही त्यांच्या बरोबर होता. सुर्वे रक्कम काढत असताना पाठीमागे असलेले दोघे जण हळूच व्यवहार पाहत होते. रक्कम न निघाल्याने सुर्वे पावती पाहत होते त्यावेळी या दोघांनी हातचलाखीने एटीएम बदलले. काही वेळानंतर शिरवळ, वेळे, आसले येथील पेट्रोलपंपावरून खात्यामधील तब्बल ५० हजार ८१० रुपये काढल्याचा संदेश नीलेश सुर्वे यांच्या मोबाइलवर आला त्यांनी तात्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दखल केला.गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून सीसीटीव्हींची पाहणी आणि गुन्हेगारांच्या चोरीच्या पद्धतीचा अभ्यास केला असता ही टोळी उल्हासनगर, ठाणे येथील असल्याचे ओळखले. दरम्यान हि टोळी उल्हासनगरला निघाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी लगेचच सापळा रचून त्यांच्या कारचा पाठलाग करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या.

विविध राज्यात गुन्हे
या चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता अनेक गुन्हे उघडकीस आले. हि टोळी २०१२ पासून कार्यरत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचोपर्यंत विविध ठिकाणी फसवणूक चोरी करत हि टोळी मालामाल होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

दरम्यान, या आरोपींनी शिरवळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांसह ठाणे ग्रामीण येथील पडघा, सोलापूर येथील सांगोला, अहमदनगर येथील राहुरी, पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमधील आठ गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच या टोळीवर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रामध्ये २४ गुन्हे दाखल आहेत.