एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – भिवंडी वसई महामार्गावरील युनियन बँकेचे ए.टी.एम.वर दरोडा टाकून चोरट्यांनी ९ लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना आज (रविवार) पहाटे तीनच्या सुमरास भिवंडीतील अंजूराफाटा येथे घडली. अंजुरफाटा येथील शिवाजीनगर रस्त्यावर युनियन बँकेचे एटीएम आहे. पहाटे चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला आणि गॅसकटरच्या मदतीने एटीएम मशीन तोडले.

भिवंडी-वसई मार्गावरील अंजुरफाटा येथे चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडत असताना कोणालाही समजली नाही तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नसल्याचे समोर आले आहे.

चोरट्यांनी ९ लाख ९० हजार सातशे रुपयांची रक्कम लंपास करून पळ काढला. रविवारी सकाळी एटीएम सेंटर शेजारील किराणा दुकानदार तेथे गेल्यावर ही घटना उघडकीस आली. दुकानदाराने तातडीने या घटनेची माहिती नारपोली पोलीस ठाण्यात दिली. चोरीची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधवयांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम हे एजीएस या कंपनीचे असून त्यांचे कर्मचारी प्रशांत भट यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
३० तोळे सोन्यांसह ९ लाखांचा मुद्देमाल लंपास

मालवण : मालवण तालुक्यातील खैदा-कातवड येथील प्रतिभा पद्माकर ढोलम यांच्या बंद घराचे कुलूप फोडून कपाटातील ३० तोळे सोने व रोख 3 हजार रुपये असा एकूण सुमारे ९ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी  सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याने कातवड गावात एकच खळबळ उडाली आहे.

मालवण-खैदा कातवड येथे ढोलम कुटुंबीयांचे मूळ घर आहे. मात्र, सध्या त्या मालवण येथे नातवांसह भाड्याने राहतात. तर त्यांचा मुलगा प्रवीण हा कराड येथे महावितरणमध्ये नोकरीस आहे. दसर्‍या दिवशी आपल्या कातवड येथील घरी आलेल्या प्रवीण याने घरातील कपाटात दोन डब्यांमध्ये दागिने ठेवले होते. त्यानंतर तो पुन्हा कामास कराड येथे गेला. शनिवारी सकाळी तो कातवड येथील घरी परतला असता त्याला घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. आतील कपाट फोडून सोन्याचे सर्व दागिने व कोटाच्या खिशात ठेवलेले ३ हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याची माहिती प्रवीण याने स्थानिक ग्रामस्थांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.