पुण्यातील धक्कादायक प्रकार ! ATM मध्ये पैसे भरणाऱ्यांनीच पळवली 99 लाखांची रोकड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले पैसे दोघांनी परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतून एटीएममध्ये भरण्यासाठी पैसे घेतले मात्र, त्यापैकी ठरावीकच रक्कम भरून उर्वरीत रक्कम हडप केली. खडकी येथील सिक्युरिटी ट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीला दोघांनी तब्बल 99 लाख 56 हजार 600 रुपयांना गंडवल्या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश जोशी (वय-34 रा. हिरकणी सोसायटी, शिंदेनगर), सुजय पवार (वय-23 रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सिक्युरिटी ट्रान्स इंडियाचे अधिकारी शैलेश डाहाके (वय -34 रा. वारजे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी ट्रान्स इंडिया कंपनीकेड वेगवेगळ्या बँकांमधील एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये रोख रक्क जमा करण्याचे काम देण्यात आले आहे.

हे काम करण्यासाठी कंपनीकडे 22 कस्टोडियन असून त्यांना रुट ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार जोशी आणि पवार यांच्याकडे 13 मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी रक्कम दिली जात होती. या दोघांनी 13 मशीनपैकी बँक ऑफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँकेच्या एकूण 11 एटीएम सेंटरमधील मशीनध्ये पैसे भरताना काही रक्कम मशिनमध्ये भरली. मात्र, अकाऊंटमध्ये सर्व रक्कम भरल्याची नोंद दोघांनी केली.

हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु होता. दरम्यान, 4 ऑक्टोबर पासून दोघांनी कामावर येण्याचे बंद केले. त्यामुळे कंपनीला संशय आल्याने एटीएममध्ये भरलेल्या रकमेचे ऑडिट केले. यामध्ये दोघांनी मशीनमध्ये दिलेले पूर्ण पैसे न भरता 99 लाख 56 हजार 600 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शकिल पठाण करीत आहेत.

Visit : Policenama.com