चोरट्यांनी चक्क ATM मशीनच पळवले ; १ किलोमीटर नेले ओढत

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – ‘एटीएम’ मशीन फोडून चोरट्यांनी ‘एटीएम’ उचलून ते एक किलोमीटरपर्यंत लांब नेले. परंतु, मशीन फोडता न आल्याने चोरट्यांना हात हलवत परत जावे लागले. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे हा प्रकार घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोरडगाव येथे पाच वर्षांपासून इंडिया वन कंपनीचे ‘एटीएम’ मशीन आहे. कालच या मशीनमध्ये संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रोकड भरली होती. या ठिकाणी कंपनीने एकही सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही. शनिवारी (२५ मे) पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या व्यापारी गाळ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला काळा रंग लावून एटीएम उचलले. ते उचलून पाथर्डी रस्त्यावर एक किलोमीटरपर्यंत लांब नेले.

चोरट्यांनी रस्त्याच्या कडेलाच मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. सदर मशीन फोडता आले नाही. हे मशीन नेताना चोरट्यांनी वाहनाचा वापर न करता रस्त्याने ओढतच नेले होते. शनिवारी सकाळी कोरडगावच्या काही ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी व कर्मचारी एटीएम पडलेल्या ठिकाणी आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.