पुण्यातील IDBI बॅंकेचे ATM फोडून २१ लाख रुपये लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-अहमदनगर रस्त्यावर पेरणेफाटा येथे महामार्गालगत असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली. गॅसकटरने एटीएम कापून त्यातील रोकड चोरुन नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडल्यानंतरही ही घटना घडली असून त्यांच्या आणखी काही टोळ्या कार्यरत असल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले आहे.

याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) येथे पुणे नगर महामार्गालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याची खबर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समजल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस पथक व बँकेच्या अधिकाऱ्यांसह रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घटनास्थळी पाहणी केली. यावेळी एटीएम मशिनची एका बाजुची लोखंडी प्लेट गॅस कटरच्या सहायाने कापून एटीएम मशीन उघडल्याचे व त्यातून २१ लाख ८६ हजार रुपये लुटल्याचे निदर्शनास आले.

आदल्या दिवशी २६ लाखांची रोकड भरल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या एटीएमच्या दोन्ही बाजूने भाजी बाजार व वर्दळीचे ठिकाण असूनही चोरी झाली. चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम मशीन कापून नेल्यानंतर एटीएम सेंटरचे शटर खाली ओढून ठेवले होते. त्यामुळे लोकांना ते बंद असल्याचे वाटल्याने कोणीही तिकडे गेले नाही. चोरट्यांनी १३ ते १४ जूनच्या मध्यरात्री ही चोरी केली असल्याची शक्यता आहे.

रविवारी दुपारी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅन पथकाला शटर अर्धवट बंद दिसल्याने त्यांनी ही घटना बँकेला कळवली. दरम्यान बँकेचे अधिकारी व लोणीकंद पोलीस सायंकाळी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.