पुण्यातील रांका ज्वेलर्स वर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका वकीलाने रांका ज्वेलर्समधील सुवर्ण समृद्धी योजनेत गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रांका ज्वेलर्सचे अनिल रांका यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाळासाहेब एकनाथ चोखर (वय-65 रा. समतानगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब चोखर यांनी रांका ज्वेलर्सच्या बंडगार्डन शाखेत सुवर्ण समृद्धी योजनेत पैसे गुंतवले होते. या योजनेनुसार 11 हप्ते भरल्यानंतर 12 वा हप्ता रांका ज्वेलर्स भरणार होते. जमा झालेल्या पैशातून सोने खरेदी करण्याची अट या योजनेत होती. त्यानुसार फिर्यादी यांनी रांका ज्वेलर्समध्ये 5 हजार प्रमाणे 11 महिने पैसे भरले. ते सोने खरेदी करण्यासाठी गेले असता अनिल रांका यांनी त्यांना सोने देण्यास नकार दिला. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली.

फिर्यादी यांनी 25 जानेवारी 2019 पासून रांका ज्वेलर्समधील योजनेत पैसे जमा केले होते. मात्र, त्यांची फसवणूक करून त्यांना जातीवाचक शिविगाळ करण्यात आल्याची तक्रार बाळासाहेब चोखर यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अनिल रांका यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.