‘2 लाख द्या उपोषण मागे घेतो, नाहीतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो’, पुण्यात आंदोलनकर्त्याची धमकी

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन –2 लाख रुपये द्या, मी उपोषण मागे घेतो. अन्यथा तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देणाऱ्या एका आंदोलकाविरूद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित माणिक छाजेड असं या आरोपीचं नाव आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनाधिकृत बांधकाम करण्यात आलं. यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डानं या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस बजावली. सदर बांधकामावर तात्कळा कारवाई करावी यासाठी अमित माणिक छाजेड यानं बंडाचा पवित्रा घेत उपोषणाला सुरुवात केली.

आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत मिळून अमित माणिक छाजेड यानं आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणा दरम्यान व्यापाऱ्यांसोबत काही तडजोड होते का या विचारात तो होता. छाजेडनं देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनय बरोटा यांना फोन करून 17 व्यापाऱ्यांनी मिळून मला 2 लाख रुपये द्या. मी माझे आंदोलन उपोषण स्थगित करतो. अन्यथा माझ्या आंदोलनामुळं कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणाऱ्या कारवाईला सामोरं जा. जर मागणी पूर्ण झाली नाही तर व्यापाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकीही त्यानं दिली.

विनय बरोटा यांनी अमित छाजेड सोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं. इतर व्यापाऱ्यांसोबत मिळून त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. देहूरोड पोलीलस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि अमित माणिक छाजेड याच्याविरोधात भादंवि कलम 385 अंतर्गत खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.