कल्याण-डोंबिवलीत KDMC च्या भरारी पथकावर हल्ला, तिघे अटकेत

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या भरारी पथकाच्या प्रमुखाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. रमेश रामफकीर पटेल, महेश रामफकीर पटेल आणि अमोर विचारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्व भागातील टाटा लाईन जवळ एक व्यक्ती उघड्यावर कचरा टाकत असल्याचे महापालिकेच्या भरारी पथकच्या निदर्शनास आले. भरारी पथकाचे प्रमुख दिगंबर वाघ यांच्या पथकाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्याला पकडून गाडीत बसवले. त्याच्याकडून दंडाची रक्कम फाड म्हणून मागणी केली. तेव्हाच एक व्यक्ती तेथे आला आणि त्याने गाडीचे स्विच तोडून ते दिगंबर यांच्या डोक्यात मारले आणि जखमी केले.

तसेच भरारी पथकाच्या गाडीची काच फोडत दंड भरण्यास नकार दिला. या घटनेनंतर दिगंबर यांनी तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करुन सरकारी अधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला. तर अन्य एका आरोपीस अद्यापही अटक झाली नाही.

दरम्यान, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रत्येक विभागात भरारी पथकाची निर्मिती केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून ही कारवाई सुरु असून, दिगंबर यांच्या पथकाने आतापर्यंत ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.