पत्नीशी बोलतो म्हणून युवकावर खुनी हल्ला, शिव वाहतूक सेना अध्यक्ष आणि स्वीकृत सदस्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादातून एकाला तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना येरवड्यात गुरुवारी रात्री घडली. विजय गणपत रणसुरे(वय ३२, रा. नवी खडकी येरवडा) हा याप्रकरणात गंभीर जखमी झाला आहे. येरवडा पोलिसांनी शिव वहातूक सेनेचा अध्यक्ष बापू खरात, स्विकृत सदस्य राकेश चौरे, गणेश मोरे, स्वप्नील कांबळे यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बापू खरात याने विजय याला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर पाण्याच्या टाकीजवळ बोलावून घेतले. राकेश चौरे याने ‘‘माझ्या बायकोबरोबर बोलू नको, तिला नादी लावू नको, तुला किती वेळा सांगू’’ असे बोलून त्याला मारहाण करण्यास सुरुवाती केली. याचवेळी खरात याच्यासह चौरे, गणेश व स्वप्निल यांनी विजय याला लाथा बुक्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार केले.

गंभीर जखमी अवस्थेत विजय याने येरवडा पोलिस स्टेशन गाठले. येरवडा पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनास्थळी जाऊन नितीन उर्फ बापू खरात, राकेश चौरे, गणेश मोरे आणि स्वप्नील ऊर्फ सनी कांबळे (सर्व रा. येरवडा) यांना ताब्यात घेतले.
बापू खरात हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहे. सध्या शिवसेना प्रणीत शिव वहातूक सेनेचा तो पुणे शहर अध्यक्ष आहे. राकेश चौरे हा येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचा स्विकृत सदस्य आहे.