काबूलमध्ये अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावर हल्ला, 10 ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात देशाच्या पहिल्या उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. त्यात उपाध्यक्षांच्या अंगरक्षकांचा समावेश आहे, असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे.

बॉम्बहल्ल्यात अफगाणिस्तानाचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह हे किरकोळ भाजले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. मी व माझा मुलगा एकत्र होतो, पण आम्ही वाचलो आहोत. जे मरण पावले त्यांच्या नातेवाइकांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे प्रवक्ते रझवान मुराद यांनी हा भयानक दहशतवादी हल्ला असल्याचे सांगून त्यात सालेह यांना ठार मारण्याचा इरादा होता असे म्हटले आहे.

दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने या हल्ल्यात सहभागाचा इन्कार केला असून आजच्या स्फोटाशी आमचा संबंध नाही, अफगाणिस्तानात तालिबान व आयसिस कार्यरत असून आता कुणावर संशय घ्यायचा हा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानचे प्रथम उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांना लक्ष्य करून झालेल्या भीषण बॉम्बहल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला.‘अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्यावरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भारत कडक निषेध करतो’, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्विटरवर म्हणाले आहेत.