‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलांना लागणारे ऑनलाईन गेम चे व्यसन हे जगभरातील पालकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. या व्यसनापायी कित्येकांनी आपला जीवही गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात ताजी असतानाच पब्जी गेम खेळण्यास मोबाईल न दिल्याने मित्रानेच मित्रावर धारदार कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सुनील माने (वय-१९ रा. शिंगोट प्लाझा, हडपसर) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सनी पांडुरंग लोंढे (वय-१८) आणि करण वानखेडे (वय-२२ दोघे रा. डवरीनगर, लोखंडी पुलाजवळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हेमंतसिंग रजपुत (वय-२४ रा. महम्मदवाडी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रजपुत आणि आरोपी लोखंडीपुलाजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी सनी लोंढे याने रजपुतकडे पब्जी गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. त्यावेळी रजपुतचा मित्र जखमी सुनील याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने सनीला राग आला. त्यामुळे या दोघांमध्ये बाचाबाची होऊन त्यांच्यात वाद झाले. याच वादातून आरोपी सनी आणि करण यांनी सुनील माने याला आता सोडायचे नाही, त्याला जीवे मारायचे असे म्हणत त्याच्याजवळील धारदार कोयत्याने सुनील मानेच्या डोक्यात वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनीलला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेमंतसिंग रजपुत याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या सनी लोंढे आणि करण वानखेडे यांचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम.डी. पाटील करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like