पिंपरीत हॉटेल चालकावर खुनी हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील चंद्रफुल गार्डन हॉटेल जवळ कचरा पेटवल्यावरून झालेल्या वादातून हॉटेल व्यवसायिकाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास  घडली.

या प्रकरणक राजेंद्र चंद्रभान गुप्ता (५६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली असून ते जखमी झाले आहेत. निखिल दत्तात्रय तापकीर (२८, रा. शिवनगरी, आळंदी रोड, वडमुखवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गुप्ता यांचे आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे चंद्रफुल नावाचे हॉटेल आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते त्यांच्या हॉटेल मधील बाथरूममध्ये गेले असता त्यांना हॉटेलच्या कंपाउंडजवळ धूर येत असल्याचे दिसले. धूर कश्याचा येत आहे हे पाहण्यासाठी एक वॉचमन गेला.

आगीमुळे हॉटेलच्या कंपाउंडजवळ असलेल्या झाडांना इजा पोहोचू नये यासाठी वॉचमन तिथेच थांबला. त्यावरून निखिल याने हॉटेल परिसरातील झाडे पेटवून देण्याची धमकी देत राजेंद्र यांना शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये निखिल कु-हाड घेऊन राजेंद्र यांच्या हॉटेलमध्ये धावून आला. निखिलने राजेंद्र यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजेंद्र जखमी झाले. तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like