उधारी मागितल्याच्या रागातून चाकूने सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून तिघांच्या टोळक्याने किराणा दुकानदाराच्या मुलावर चाकूने सपासप वार करून लोखंडी फायटरने मारहाण केली. तसेच मुलाच्या आई-वडिलांनाही लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. राहाता तालुक्यातील लोहगाव येथे ही खळबळजनक घटना घडली.

याप्रकरणी राहुल दिलीप पवार (वय 24, रा. लोहगाव, प्रवरानगर, ता. राहाता) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भगवान लिंबाजी ठोंबे, शरद भगवान ठोंबे, भारत भगवान ठोंबे (सर्व रा. लोहगाव, ता. राहता) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी युवकाची आई जिजाबाई दिलीप पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ठोंबे कुटुंबीयांची पवार यांच्या किराणा दुकानात उधारी होती. उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून रविवारी दुपारी ठोंबे कुटूंबियांनी जिजाबाई पवार यांना शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली. सदर वाद मिटविण्यासाठी त्यांचा मुलगा राहुल पवार हा आला असता भगवान ठोंबे याने राहुलच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे राहुल हे गंभीर जखमी झाले.

तसेच इतर दोघांनी जिजाबाई पवार व त्यांचे पती दिलीप पवार यांना लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी जिजाबाई ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.