मावळमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण, आमदाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत भाजपकडून प्रबळ दावेदार असलेले सुनिल शेळके यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला गुरुवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली. विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचा दावा सुनिल शेळके यांनी केला आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री वराळे गावात घडला असून कल्पेश मराठे असे जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

मारहाणीमध्ये मराठे याचे दोन्ही पाय, एक हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मराठे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या मारहाणीत आमदार बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याचा आरोप शेळके यांनी केल्याने मावळ विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापू लागले आहे. भाजपचे दोन गट आमने सामने आल्याने तळेगाव दाभाडे येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कल्पेश मराठे हे गणपतीच्या आरतीसाठी गेले होते. त्यानंतर ते मित्रांसोबत बोलत उभे असताना कार आणि दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कल्पेशला बोलावून घेत तू शेळकेच्या पाठीमागे का फिरतोस अशी विचरणा करून त्याला पाईप आणि लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी कल्पेश मराठे याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप भेगडे, बेल्लू उर्फ अजय भेगडे, प्रतीक भेगडे, अविष्कार भेगडे, अनिकेत भेगडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर प्रतीक भेगडे याने कल्पेश मराठे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रार दाखल करून घेतल्या आहे. प्रतीक भेगडे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री मगळूर येथे जात असताना वाराळे फाटा येथे गाडीचे चाक खड्ड्यात गेल्याने खड्ड्यातील पाणी एका व्यक्तीच्या अंगावर उडले. त्यावेळी त्या व्यक्तीची माफी मागितली. तरीही बांबूने माराहण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणात सुनिल शेळखे यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर आरोप करत मावळची जनता दादागिरी व दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. निवडणूक लोकशाही मार्गाने व प्रेमाने लढावी असे देखील शेळके यांनी म्हटले आहे. तर राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शुल्क कारणावरून काही तरुणांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे बाळा भेगडे यांनी म्हटले आहे.