‘सोहराबुद्दीन, लोया प्रकरण कस दाबलं आम्ही बघितलंय’ : भाजपाला काँग्रेसचे प्रत्युत्तर

दिल्ली : वृत्तसंस्था – १९८४ च्या शीख दंगल खटल्यात काँग्रेसचे सज्जन कुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दरम्यान तीन तीन राज्यातील पराभवामुळे धक्क्यात गेलेल्या भाजपला यानंतर चांगलेच स्फुरणं चढल्याचं दिसत आहे. १९८४च्या शीख दंगल प्रकरणात  कमलनाथ यांचाही सहभाग होता, असा आरोप भाजपने केला होता. यालाच अनुसरून सदर आरोपाला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. जो निर्णय आला आहे तो कायदेशीरच आहे. याच राजकारण करू नये. सोहराबुद्दीन बनावट चकमक आणि न्या. लोया प्रकरण कसं दाबण्यात आलं हे आम्ही बघितलं आहे’ अशी वर्मावर बोट ठेवणारी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये शीख दंगल उसळली होती. दरम्यान याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालायने काँग्रेसचे सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यानंतर बळ चढलेल्या भाजपने आणि अकाली दलाने काँग्रेसवर ताशेरे आेढण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर  या दंगलीत कमलनाथ यांचाही मोठा सहभाग होता, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. याच आरोपाला उत्तर देत काँग्रेसनेही भाजपवर टीका केली आहे. कायद्याने आपलं काम केलं आहे. यातून कोणताही राजकीय लाभ लाटण्याचा प्रयन्त करू नये, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावर बोलताना  काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल म्हणाले की, “न्यायालयाकडून जो निर्णय झाला आहे, तो कायदेशीर आहे. सोहराबुद्दीन बनावट चकमक कशी दाबली. न्या. लोयांच्या मृत्यूचं काय झालं?? ते आम्ही बघितलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाला राजकीय रंग देऊ नये.” इतकेच नाही तर, ‘२००२ मधील गुजरात दंगलीमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे आहेत’ असे सांगत काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवले.

भाजपच्या आरोपावर बोलताना काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील कुमार झाखर म्हणाले, “जे दंगलीग्रस्तांना न्याय मिळायला हवा ही काँग्रेसची भूमिका आहे. न्याय मिळायला उशीर झाला पण मिळाला आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही.” असं ते संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.